‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठक
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्या. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिले.
‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, ॲड. जयंत नवले आदि उपस्थित होते.
ते म्हणाले, जिल्ह्यात माता मृत्यू दर रोखण्यात यश येत आहे. मात्र, अर्भक मृत्यू दर रोखणे व मुलींचा जन्मदर वाढवणे हे आव्हान आहे, या आव्हानावर मात करण्यासाठी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाने परस्पर समन्वय ठेऊन अधिकाधिक जनजागृती उपक्रम हाती घ्यावेत. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी यासाठी अधिक जागरूकतेने काम करावे.





