ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटरचे वितरण
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील महसूल विभागाचा कणा असलेले तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी आता हायटेक होणार आहेत. अगोदरच महसूल विभागाचे बहूतांश काम आधुनिक झाले आहे. आता या कर्मचाऱ्यांना सुलभ कामासाठी लॅपटॉप मिळाले आहेत. आज सांगलीत झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक महसूल अधिकारी हा सक्षम असणे आवश्यक आहे. सातबारा संगणकीकरण, ऑनलाईन फेरफार नोंदी, ई-चावडी यासह इतर कामे ऑनलाईन करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने जमाबंदी आयुक्तांनी ३३२ लॅपटॉप आणि ४६ प्रिंटर्स मंजूर केले आहेत. यातील ५३ लॅपटॉप मिरज आणि सांगली अपर कार्यालयातंर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. तलाठ्याचे काम अधिक वेगवान आणि जनताभिमुख होण्यासाठी हे आवश्यक आहे. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





