सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत;
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज शहरातील उपनगरातून दुचाकी चोरीसह कोल्हापूर रोडवरील दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुनिल मारूती धुमाळ (रा. चौगुले मळा, म्हैसाळ रोड, मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून प्रत्येकी पन्नास हजार रूपयांच्या दोन दुचाकीसह मोबाईल आणि रोकड असा एक लाख १४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना संशयित त्यांना आढळून आला. पथकातील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर रोडवरील फर्निचरच्या दुकानाचा पत्रा उचकटून आतील चोरी केल्याचे सांगितले तर मिरजेतील इंदिरानगर येथून दुचाकीची चोरी केल्याचे सांगत सुमारे दहा महिन्यांपूर्वी मिरजेतून अजून एक दुचाकी चोरी केल्याचीही कबुली त्याने दिली. पोलिसांच्या अधिक तपासात या चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील तपासासाठी त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.





