मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रभावीपणे राबवा
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे प्रतिपादन
सांगली : मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रभावीपणे राबवावी. त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने जलसंपदा, जिल्हा परिषद, कृषि अशा अन्य संलग्न विभागांशी समन्वय साधून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विनोद राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा जलसंधारण अधिकारी बा. वि. आजगेकर, जिल्हा विकास आराखड्याचे समन्वयक चंद्रकांत पाटील यांच्यासह मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, या योजनेतून कष्टकरी मच्छिमार व मत्स्यकास्तकार यांना आधुनिक तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा व आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या अनुषंगाने मत्स्य बीज निर्मिती व संगोपन, संवर्धन, मासळी उतरवण्याची ठिकाणे, मासे सुकविणे, मत्स्यबाजार, नदी पुनर्भरण, कोल्ड स्टोरेज आदिंचा विचार करून तपशीलवार कृती आराखडा तयार करावा. विविध योजनांच्या समन्वयाने स्थानिक मच्छिमारांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊन मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.
या बैठकीत जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.





