मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी; दराबाबत उत्सुकता कायम
सांगली : मराठी नववर्षाचे स्वागत आणि शुभमुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याला सांगलीतील बाजारपेठेत चांगली खरेदीचा उत्साह दिसून आला. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या ऑफर्स आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद दिसून आला. यंदा गुढी पाडव्याला सर्वाधिक आकर्षण ठरले ते सोने खरेदी. आखाती देशातील युध्दाच्या परिस्थितीमुळे सोनेदरात चांगलीच घसरण सांगली सराफ बाजारात होती. ही दरातील घसरण अजून किती दिवस असेल याचा अंदाज बांधला जात आहे.
आखाती देशातील युध्दस्थिती वाढतच चालल्याने त्याचा फटका देशात जाणवत आहे. जागतिक बाजारातील सोने दरावरही याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळेच यंदा दरातील घसरण अनुभवण्यास मिळाली. काल गुढी पाडव्यादिवशी सकाळी सांगली सराफ बाजारात अचानक अडीच हजारांची घसरण झाली. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा प्लान केलेल्या ग्राहकांना त्याचा लाभ झाला.यामुळे पहिल्यांदाच गेल्या काही महिन्यानंतर सोन्याचा दर दिड लाखांच्या आतमध्ये आला. सांगलीतील गुढी पाडव्याचा दर एक लाख ४९ हजार ९०० रूपये होता.
विविध कंपन्यांकडून ऑफर, सुलभ कर्जसुविधा आणि त्यासाठीही कंपन्यातील स्पर्धा यामुळे दुचाकीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला विशेष पसंती मिळाली होती. यासह वाहन खरेदीचाही बुस्टर सांगली बाजारपेठेला अनुभवता आला. दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची संख्या अधिक आणि त्याप्रमाणात दुचाकी उपलब्ध नसल्याने वितरकांनी नाराजी व्यक्त केली. तरीही अगोदर बुकींग केलेल्या ग्राहकांना दुचाकीचे वितरण करण्यात आले. यात अडीच हजारावर दुचाकी तर पाचशेवर मोटारी रस्त्यावर आल्या आहेत.





