ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील तिन्ही शहरातील ड्रेनेजची कामे रखडली आहेत. यावरून महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांची आक्रमक भूमिका घेत तक्रारी मांडल्या. यावर ठेकेदाराला मुदत देत म्हणणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही तो आला नाहीतर त्याला काळ्या यादीत समाविष्ट करा, असा आदेश महापौर धीरज सुर्यवंशी यांनी दिला.
सांगली,मिरज आणि कुपवाड शहरातील ड्रेनेजची कामे अद्यापही रखडली आहेत. मिरज येथील काम केवळ पाच टक्के बाकी असल्याचे ठेकेदार कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. तरीही हे काम पूर्ण करून ड्रेनेजची चाचणी होत नाही. यावर निधी नसल्याने काम थांबवल्याचे सांगण्यात आले. यावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.
सांगली शहरातीलही काम बाकी आहे.कुपवाडमधील कामामुळे रस्त्याची वाट लागल्याचे नगरसेवकांनी सांगितले. तसेच हे काम संथगतीने सुरू असल्याबाबतही तक्रार करण्यात आल्या आहेत.





