सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॉलीला मोटारीने पाठीमागून दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. संतोष धोंडीराम गायकवाड आणि वंदना संतोष गायकवाड (दोघेही रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. गायकवाड दाम्पत्य धाराशिवकडे जात होते.
शिरढोणजवळ रस्त्यालगत साईड पटटीवर ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. मोटारीने वेगात पाठीमागून त्याला धडक दिली. यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. घटनेची माहिती महामार्ग पोलिसांसह कवठेमहांकाळ पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवून वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त वाहने हलवली.





