कंपन्या दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर; हळद, बेदाणा, गूळाचा समावेश
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : बदलती बाजारपेठ आणि त्यानुसार करावयाचे बदल स्विकारत शेतकऱ्यांनाही नवीन बदल स्विकारणे आवश्यक आहे. यासाठी त्यांचा शेतीमाल ऑनलाईन बाजारपेठेत उपलब्ध व्हावा, यासाठी आता जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार प्राथमिक टप्प्यात सांगलीची हळद, बेदाणा आणि गूळ ही तीन उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी निवडली गेली आहेत. दोन दिवस कंपन्यांचे अधिकारी जिल्ह्यात फिरून याची माहिती घेणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील उत्पादनांची ऑनलाईन विक्री होण्यासाठी ‘माझी सांगली, माझा अभिमान’ या सांगली पॅटर्न अंतर्गत प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उत्पादनांची देशभरात विक्रीवाढ व्हावी व उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देता येईल, या दृष्टीने हे पाऊल टाकण्यात येत आहे. त्यानुसार कंपनीचे अधिकारी माहिती घेणार आहेत. त्यानंतर यावर पुढील कार्यवाही होणार आहे.





